- This event has passed.
माय मराठीची जोपासना करत ज्ञानसंपदा शाळेत भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवा
सावेडी उपनगरातील उपक्रमशील शाळा म्हणून ज्ञानसंपदा शाळेची ओळख आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना त्यांना संस्काराची जोड द्यावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (कविवर्य कुसुमाग्रज जयंती) शाळेत विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी माय मराठी व संस्कार या विषयाला अनुसरून कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये अभिजात मराठी भाषेची रुजवन होऊन, मराठी भाषेतील संत साहित्य, लोकसाहित्य, तसेच साहित्य संपदा याबद्दल अधिक माहिती मिळावी व माय मराठीचे संवर्धन व्हावे या अनुषंगाने कीर्तन सेवा आयोजित केली होती.
ही कीर्तन सेवा प्रसिद्ध बाल कीर्तनकार हरिभक्त परायण कु. रेणुकाताई निसळ यांच्या अमृतवाणीतून साकार झाली, जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे आपल्या रसाळ वाणीतून निरूपण केले. ताईंनी आपल्या कीर्तनातून देव, देश आणि धर्म याबद्दल आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त केले तसेच मराठी भाषेचे महत्त्व सांगितले आई-वडिलांचे आपल्या जीवनातील योगदान किती असते याबद्दल अनेक दृष्टांत दिले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाणाक्ष बुद्धीचा शौर्याचा व पराक्रमाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन केले
हार्मोनियमची साथ श्री मुरकुटे सर तसेच तबल्याची साथ श्री भावे सर यांनी दिली.
या कीर्तन सेवेसाठी संस्थेचे खजिनदार अविनाशजी बापर्डीकर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवांजली अकोलकर सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत भाग्यश्री जाधव, प्रास्ताविक शिल्पा कुलकर्णी, तसेच ताईंचा परिचय श्री कैलास जाधव यांनी केला.


