Loading Events
  • This event has passed.

School Inauguration

April 4, 2023

विस्तारित वास्तू उद्घाटन समारंभ
* कृपाप्रसादाचा शुभाशिष*

“आपले मूल किती शिकले आणि किती पैसा, ऐहिक सुख मिळवते त्यापेक्षा ते प्रथम माणूस म्हणून कसे आहे आणि काय करते याला अधिक महत्त्व द्या” ही शिकवण ज्ञानसंपदा शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी आणि पालकांनी साक्षात गुरु गोविंदगिरी महाराजांच्या तोंडून ऐकली. निमित्त होते शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन प्रसंगाचे! अहमदनगरच्या सावेडी भागात गेल्या वर्षात नावारुपाला आलेली ही शाळा थोड्याच काळात प्रगतीपथावर यशस्वी मार्गक्रमण करत आहे. या शाळेच्या इमारतीच्या पायाभरणी प्रसंगी ही गुरुगोविंद गिरी महाराज आशीर्वाद देण्यास लाभले होते. आणि आज 2023 सालात टप्प्याटप्प्याने चालू असलेले शाळेचे बांधकाम पूर्ण होऊन सुसज्ज अशी वास्तू उभी राहिली आहे. दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी गुरु गोविंददेव गिरी महाराज यांचे सकाळी शाळेत आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात तसेच लेझीम पथकाच्या सादरीकरणाने महाराजांचे स्वागत करण्यात आले. वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरस्वती पूजन महाराजांच्या हस्ते करण्यात आले आणि शाळेतील काही वर्ग खोल्यांना महाराजांनी भेट दिली. तेथे पावन मंत्रोच्चाराने आणि आपल्या पदस्पर्शाने महाराजांनी शाला वास्तूस शुभाशीर्वाद दिले. बाल वर्गाच्या खेळांगणाचे उद्घाटनही याच प्रसंगी महाराजांच्या हस्ते झाले. शाळेच्या यशवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही या निमित्ताने केला गेला. शाळेच्या वास्तू उभारणीस मदत करणारे तंत्रज्ञ, शाळेत वेळोवेळी योग्य शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक, कायदेशीर बाबीत सल्ला देणारे सल्लागार तसेच नगरसेवक व अन्य मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त श्री प्रवीण बजाज व श्री अरुण कुलकर्णी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेले श्री गोविंद गिरी महाराज यांनी अनेक दाखले देत श्रीराम प्रभू प्रमाणे आदर्शवत जीवन जगण्याचा मोलाचा सल्ला याप्रसंगी दिला. ‘मुलांचे भवितव्य- पालकांची भूमिका’ या विषयावर त्यांनी अतिशय ओघवत्या शैलीत पालकांचे उद्बोधन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेच्या प्रशासक डॉ. अमिता जैन संस्थेचे सर्व विश्वस्त, मान्यवर, मुख्याध्यापिका सौ.शिवांजली अकोलकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व उत्साही विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला.

April 4, 2023